चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर/जळगाव, 8 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. जळगावमध्ये आता ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (सीआयआयआयटी)’ प्रकल्प आता लवकरच साकारणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या जिल्ह्यातच उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योगसंधी उपलब्ध होतील.
याबाबत माहिती देताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्यासाठी CIIIT (सेंटर फॉर इन्वेंशन, इनोव्हेशन, इंक्युबॅशन अँड ट्रेनिंग) मंजूर झाले आहे. यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनेही संमती दर्शवली आहे.
जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार –
CIIIT च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आपल्या भागातील औद्योगिक प्रगतीलाही नक्कीच चालना मिळणार आहे.

हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ३००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. हे केंद्र जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती देणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.






