नंदुरबार, 5 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजलाय. या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना देखील वेग येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचं की युती-आघाडी करून लढायचं यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली असून नंदुरबारमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री तथा भाजप नेते विजयकुमार गावित यांनी स्पष्ठ केलीय.
‘नंदुरबारमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार नाही!’ –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना विजयकुमार गावित म्हणाले की, आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलंय की, ज्याठिकाणी युती करणे शक्य त्याठिकाणी युती करा. मात्र, ज्याठिकाणी युती करणे शक्य नसेल त्याठिकाणी जिल्हास्तरावर निर्णय घ्या. त्यानुसार, नंदुरबार तसेच धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात भाजप-शिवसेनेची कुठलीही युती होणार नाही. दरम्यान, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात काम केल्याचाही आरोप विजयकुमार गावित यांनी केलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर –
राज्य निवडणूक आयोगाने काल दुपारी 4 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली. यानुसार, राज्यात आधी नगरपरिषद तसेच नगरपंचयातींच्या निवडणूका पार पडणार असून 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकीय पक्षांकडून प्रचाराचा नारळ फुटणार असून येत्या काळात युती-आघाड्यांबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे पुढील दोन-तीन महिने राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यत आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम






