पणजी, 15 जानेवारी : एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG), पणजी येथे ‘ट्रान्सेंड गोवा 2026’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गोव्याच्या सर्जनशील आणि डिजिटल परिसंस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विद्यार्थी, क्रिएटर्स, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक सहभागी होत असून, उदयोन्मुख सर्जनशील व डिजिटल क्षेत्रांतील संधी, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाधारित करिअरवर चर्चा होत आहे.
संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये, करिअर मार्ग आणि नव्या युगातील सर्जनशील उद्योगांवरील संवादाला चालना देत आहे. राष्ट्रीय आणि जागतिक सर्जनशील व डिजिटल अर्थव्यवस्थेत गोवा स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करू शकतो, तसेच स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि उद्योग सहकार्य वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रसंगी बोलताना माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “ट्रान्सेंड गोवा 2026 संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ आहे. यामुळे विद्यार्थी आणि तरुण क्रिएटर्सना नव्या कल्पनांचा शोध घेण्याची, प्रयोग करण्याची आणि आपली कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते. ‘विकसित भारत युवा संवाद’मध्ये माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या विचारांचा उल्लेख करताना मला वाटते की गोव्याची कथाकथन आणि कलात्मक परंपरा अॅनिमेशन, गेमिंग, इमर्सिव्ह कंटेंट, डिझाईन, संगीत आणि लेखन यांसारख्या संधींसोबत जोडली जाऊ शकते. यामुळे आपल्या युवकांना सांस्कृतिक बळावर आधारित जागतिक दर्जाची डिजिटल उत्पादने निर्माण करता येतील.”
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, “युवकांना उद्योगाशी जोडणारे, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ट्रान्सेंड गोवासारखी व्यासपीठे सर्जनशीलतेला व्यवहार्य करिअरमध्ये रूपांतरित करण्यास मदत करतात आणि विद्यार्थ्यांना व कलाकारांना नवोन्मेष व यशासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देतात.”
या कार्यक्रमास एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोव्याचे उपाध्यक्ष श्रीमती. दिलायला लोबो, सचिव श्री. कंदवेलू, आयएएस, ESG चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अश्विन चंद्रू, आयएएस, महाव्यवस्थापक श्रीमती. मृणाल वालके, तसेच विद्यार्थी, क्रिएटर्स आणि सर्जनशील व डिजिटल उद्योग क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.






