पारोळा, 27 ऑक्टोबर : पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील 25 वर्षीय अविवाहित युवकाने गळफास घेत आत्महत्या केली असून सचिन गणेश चांदवडे असे या मयत तरूणाचे नाव आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेचे कारण अस्पष्ठ असून अभिनय आणि आयटी क्षेत्र अशा दोन भिन्न क्षेत्रात स्वतःचं करिअर घडवणाऱ्या सचिनच्या या अकाली जाण्याने उंदीरखेडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन चांदवडे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी सुरू केली होती. तथापि, त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे नोकरीसोबतच त्याने कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला.
सचिनने ‘जमतारा’ या लोकप्रिय वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्ये भूमिका साकारली होती. तसेच ‘विषय क्लोज’ या चित्रपटातही त्याने काम केले होते. येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या ‘असुरवन’ या चित्रपटात तो झळकणार होता. केवळ पाच दिवसांपूर्वीच त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाशी संबंधित पोस्ट शेअर केली होती.
भाऊबीजेच्या दिवशी घेतला गळफास –
सचिन चांदवडे हा दिवाळीनिमित्त मूळगावी म्हणजेच उंदीरखेडे याठिकाणी आला होता. अशातच त्याने 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सचिनचा मोठा भाऊ डॉक्टर असून त्यांना याबाबतची माहिती मिळाली असता त्यांनी त्याची तपासणी केली आणि पारोळ्यात एका रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी त्याला हलविण्यात आले.
यानंतर सचिनची प्रकृती खालविल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. सचिन चांदवडे याचे शवविच्छेदन केल्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी उंदीरखेडे येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्याच्या पश्चात मोठा भाऊ तसेच आई आणि वडील असून त्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ठ आहे.






