चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे/जळगाव – जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि पिकअप वाहन यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय आधार भालेराव (वय-26), अशोक आधार भालेराव (वय-21) अशी या दोन्ही सख्ख्या मृत भावांची नावे आहेत. मृत तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव गावातील रहिवासी आहेत.
काय आहे संपूर्ण घटना –
अपघाताची ही दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार (PSI Anil Pawar) यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना या अपघाताबाबत संपूर्ण माहिती दिली.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, काल शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन्ही भाऊ पुण्यावरुन जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या लासगाव या आपल्या मूळगावी येत होते. या दरम्यान, संतवाडी याठिकाणी गुरूदेव हॉटेलजवळील पुलावर त्यांची दुचाकी आणि समोरुन येणाऱ्या एका पिकअप वाहनाच्या दरम्यान समोरासमोर जोरदार टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. हे पिकअप वाहन मेंढपाळ यांचे होते. त्यांच्या पिकअप वाहनात भुसा भरला होता.
यावेळी दोन्ही वाहने समोरासमोर धडकले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात, उद्या होणार अंत्यसंस्कार –
मृतांच्या कुटुंबीयांची परिस्थिती ही हालाखाची असल्याने या तरुणांच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे, तसेच समस्त गावकऱ्यांच्या वतीने पैसे जमा केले जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भालेराव आणि अशोक भालेराव या दोन्ही भावांवर उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, लासगाव गावातील दोन सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनल लिंक –
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos