खेड (रत्नागिरी), 5 मार्च : आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीच्या खेड येथे जाहीर सभा जाहीर झाली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे –
लहानपणापासून मी शिवसेनाप्रमुखांच्या सभा पाहत मोठा झालो आहे. मी आज खरं म्हणजे, तुमच्यासारख्या देवमाणसांचा आशिर्वाद घ्यायला आलो आहे. कारण, ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल, ते ते दिलं. तरीसुद्धा ते खोक्यामध्ये बंद झाली. आज माझ्याकडे काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आला आहात, यासाठी पूर्वजांची पुण्याई लागते.
जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत. त्यांना मला सांगायचंय की, तुम्ही शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही. “जिथे रावण उताणा पडला, तिथे मिंधे काय, उभे राहणार? असा सवाल करत मला निवडणूक आयुक्तांना सांगायचंय की, तुमच्या डोळ्यामध्ये जर मोतीबिंदू झाला नसेल खरी शिवसेना ही इथे आहे पाहा. तसेच हा चुना लगाव आयोग, सत्येचे गुलाम तसेच हे निवडणूक आयुक्त म्हणायच्या लायकीचे नाहीत, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
ज्या तत्त्वावर त्यांनी शिवसेना ही त्यांची आहे, असं सांगितलंय ते तत्त्वच मुळात चुकीचं आहे. शिवसेना त्यांच्या वडिलांनी नाही तर माझ्या वडिलांनी स्थापन केलीय. निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील तर ते तुमचे वडील असतील माझे वडील नाही. जे शिवसेना सोडण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न करताय, त्यांना मला सांगायचंय की, तुम्ही नेमकं काय करताय, हे तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालताय. तुम्ही शिवसेना नाही फोडण्याचा प्रयत्न करताय. तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालताय. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालताय.
भाजपला कोण गल्लीतलं कोण कुत्र विचारत नव्हतं. पण आज ते एवढ्या निष्ठुरपणाने वागताएत. ज्यांनी सोबत दिली त्यांनी आधी संपवा, असे त्यांचे धोरण आहे. पण मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा प्रयत्न मला मान्य नाही. पक्ष आणि चिन्ह देऊ शकतात पण शिवसेना नाही.
ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांनी आपल्या आईवरच वार केला. शिवसेना आपली आई आहे. शिवसेना नसती तर तुम्ही आम्ही कोण होतो. तुमच्या आईवडिलांचं नाव लावून पक्ष बांधून दाखवा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना शिंदे गटाला दिले.
बाळासाहेबांनी ज्यांनी जवळून पाहिलं नाही ते आम्हाला बाळासाहेब आणि शिवसेनेचे विचार शिकवताएत, असा टोलाही त्यांनी हाणला. तसेच ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा राज्यात उद्योगधंदे येत होते. पण गद्दार तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाले आपल्या डोळ्यादेखत राज्यातील उद्योग बाहेर गेले, हे बाळासाहेबांचे विचार आहे का, असा सवालही त्यांनी केला. दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, असेही ते म्हणाले.
मी घरात बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही गुवाहटी येथे जाऊनही सांभाळू शकत नाहीत. तुमचा अर्धा वेळ फिरण्यात जातोय. अर्थ आयुष्य दिल्लीला मुजरा मारण्यात जातंय. आणि बाकीच्यांना खोके मिळाले नाहीत, मंत्रिपद देता येत नाहीत, त्यांना सांभाळण्यात तुमचं उरलेलं आयुष्य जातंय. कोरोना काळात जागतिक स्तरावर पंतप्रधानांच नव्हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं, असेही ते यावेळी म्हणाले.
जो कुटुंब बदलत बसतो, तो महाराष्ट्र काय सांभाळणार –
महाराष्ट्राला कंगाल करु द्यायचा. आणि काचा फुटलेल्या बसची जाहिरात गतीमान महाराष्ट्र म्हणून द्यायची, लाल लज्जा शर्म नाही. स्वत:चा फोटो लावायला शर्म नाही वाटत? माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि जो कुटुंब बदलत बसतो, तो महाराष्ट्र काय सांभाळणार. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलताए, तो गतीमान महाराष्ट्र कुणाला परवडणारा नाही. एकेकाळी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे आता संधीसाधू दिसताएत. भाजप संपूर्ण देश नासवायचं काम करतंय, अशी टीकाही त्यांनी केली.