पाचोरा/मुंबई, 29 डिसेंबर : आर. ओ. तात्यांचे जाणे हा एक आघातच होता. पण त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आर. ओ. तात्यांनी जे कार्य हाती घेतले होते ते पुर्ण करण्याचा एक निश्चय केला. आर. ओ. तात्यांचा वारसा वैशालीताई पुढे नेत असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पाचोरा तालुक्यातील शिंदे गट व भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
नेमंक काय म्हणाले उद्धव ठाकरे? –
मुंबईतील मातोश्री या निवासस्थांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतो. वैशालीताई यांचं कौतुक वाटतेय. आर ओ पाटील आमचा भक्कम माणूस होता. मात्र, त्यांचे जाणे हा एक आघातच होता. पण तरीही त्या आघातात न घाबरता वैशाली ताईंनी आर. ओ. तात्यांनी जे कार्य हाती घेतले होते ते पुर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पाऊले पडत आहेत. तसेच ते कार्य पुढे नेण्याचे कार्य वैशालीताई करत आहेत.”
मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट व भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पाचोरा तालुका शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे –
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सत्तेला घाबरत असाल तर काहीच करू शकत नाही. सत्तेची भीती वाटत असेल तर ती आपण उलथवली पाहिजे. सत्ता आपली वाटली पाहिजे. नवं वर्ष सुरू होतोय, हे वर्ष लोकशाहीची जावो.