जळगाव, 9 ऑक्टोबर : ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. उद्योग भवनामुळे व्यापाराच्या नोंदणी, परवानग्या आणि इतर औद्योगिक प्रक्रियेतील किचकट कामे सुलभ होतील. तर ट्रक टर्मिनलमुळे माल वाहतूक आणि साठवणीतील अडचणी दूर होतील. या दोन्ही गोष्टींमुळे व्यापारी आणि लघु उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल हे खरोखरच वरदान ठरेल, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते 40 कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनल भूमिपूजन प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्रात बोलत होते.
यावेळी खा. स्मिता ताई वाघ व आ. संजय सावकारे यांनी सांगितले की, उद्योग भवनाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे भवन छोटे उद्योग आणि नवीन उपक्रमांना प्रोत्साहन व उद्योजकतेला चालना मिळणार असून बेरोजगारांसाठी उद्योग भवन ठरणार आशेचा किरण असून रोजगार निर्मितीचे केंद्रस्थान ठरेल.
असे असेल उद्योग भवन व ट्रक टर्मिनल –
3892 चौ, मी जागेत तीन मजली इमारत उभी राहणार असून यात जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम उद्योग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगीकसुरक्षा व आरोग्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्या इमारती एका छताखाली येणार आहे. तसेच सभागृह, व्यापारी गाळे व कॅन्टीन देखील असणार आहे. 22700 चौ, मी. जागेत ट्रक टर्मिनल मध्ये 100 ट्रकसाठी भव्य पार्किंग, ऑफीस, गरेज, विश्राम गृह, हायमास्ट व पथ दिवे रस्ते डांबरीकरण , कॅन्टीन पूर्ण भूखंडासाठी संरक्षक भिंत बांधकाम असेल. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उद्योग भवनसाठी 21 कोटी तर ट्रक टर्मिनल साठी 19 कोटी असा एकूण 40 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यात एम. आय. डी. सी. मध्ये केलेल्या सुमारे 200 कोटींच्या कामांचा लेखा – जोखा मांडून उद्योग भवन व ट्रक टर्मिनल कसे असेल याबाबत सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खादी ग्रामोद्योगचे ज्येष्ठ पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी केले. आभार DIC चे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी मानले.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, आ . संजय सावकारे, डी.आय.सी.चे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे, व्यवस्थापक प्रशांत पाटील, एम. आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, लघु भारतीचे अध्यक्ष समीर साने, जिंदा असोसिएशन चे रवी लढ्ढा, मॅट असोसिएशनचे अध्यक्ष रायसोनी व इतर सर्व औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग यांची विशेष मुलाखत