चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 27 एप्रिल : राज्यातील राजकारणातील आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर, जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राजकारणात एंट्री झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लढणार –
महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नव्हता. मात्र, भाजपने आज उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, आता उज्जल निकम विरोधात वर्षा गायकवाड अशी जोरदार लढत रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम –
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, भाजपने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे.
सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार –
तसेच मला कल्पना आहे की, राजकारण माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. पण माझे प्रामाणिक प्रयत्न असतील की, जे देशद्रोही तत्त्व आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार. भाजपने जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली.
पुनम महाजन यांचा पत्ता कट –
भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना भाजपने अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. पुनम महाजन ह्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूनम महाजन यांना उमेदवारी मिळणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज, अखेर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे या चर्चा संपल्या आहेत.
.
हेही वाचा : महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल