जळगाव, 11 फेब्रुवारी : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चाबांधणी केली जात असतानाच जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय क्षेत्रात घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरूवार (15 फेब्रुवारी) रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहा हे गुरूवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये जळगावासह अकोला व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जळगावात युवा संमेलन –
जळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मोठे युवा संमेलन घेण्यात येणार आहे. या युवा संमेलनात गृहमंत्री शहा जळगाव जिल्ह्यातील युवकांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान, अमित शहा यांचा दौरा तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी आज जामनेरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.