पुणे : हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहे. यांचे चेहरे झाकण्यापेक्षा समाजाला दाखवले गेले पाहिजे. ही ती विकृती आहे. ही ती जनावरे आहेत. ही ती श्वापदे आहेत, या शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या पुणे येथे माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला, त्याबाबत मी स्वत: पोलीस निरीक्षक मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाळखोर आहे, त्याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आताही गुन्हा दाखल होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं पोलीस पथकही रवाना झालं आहे. या टवाळखोरला आता तातडीने ताब्यात घेतलं जाईल.
पण गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, सीसीटीव्ही कॅमेरे असतात. हे सर्व असतानाही बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल. यामध्ये जो कुणी आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग त्याचा पाठपुरावा करेल. यामध्ये शुक्रवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. यात्रेच्या दरम्यान, जे आकाशपाळण्यात मंत्री रक्षाताई यांची मुलगी आणि काही मैत्रिणी बसल्या होत्या आणि हा पाळणा जेव्हा गोल फिरत होता, त्या पाळण्यात टवाळखोर मुले बसली होती.
त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि फोटो काढले. त्यावेळी एक गार्ड तिथे खाली उभा होता, त्या गार्डला असं वाटत होतं की, हे काही व्हिडिओ शुट करत आहेत. ते लवकर लक्षात आलं नाही. पण खाली उतरल्यावर गार्डने त्यांना हटकलं. त्यावरुन त्यांची बाचाबाचीही झाली. गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेले आहेत. त्यानंतर शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली. त्यावर एफआयआर दाखल होत आहे आणि त्याला अटक केली जाईल. यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता, त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे. यानंतर त्याने जे कृत्य केलं आहे. ते खरंच खूप लाजिरवाणं आहे. यामध्ये त्याला कठोर शिक्षा ही झाली पाहिजे.
मला असं वाटतं की, बऱ्याच वेळा हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहे. यांचे चेहरे झाकण्यापेक्षा समाजाला दाखवले गेले पाहिजे. ही ती विकृती आहे. ही ती जनावरे आहेत. ही ती श्वापदे आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे जे कुणी असतील, त्यांना काळा कपडा घालून त्यांचे चेहरे झाकले जातात. ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत म्हणजे हे किती निर्लज्ज लोकं आहेत आणि माणसांच्या कळपांमध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात, हे जगाला कळलं पाहिजे. खऱ्या अर्थाने, कारवाई होईल, कठोर शिक्षाही होईल. पण ही विकृती कमी झाली पाहिजे, यासाठी निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करू, असे म्हणत राज्याचा गृहविभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोग आणि त्या भागातील पोलीस याबाबत निश्चितपणे कार्यवाही करतील, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..