चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : आपल्या जिल्ह्याने मागच्या 10 वर्षामध्ये जामनेरचा असा मंत्री दिला की जो नंबर 1 आणि नंबर 2 म्हणजे मुख्यमंत्र्याचा जवळचा मंत्री म्हणून आपण बघितला. मात्र, या मंत्र्याने जिल्ह्याला नंबर 1 वर आणण्याचं विसरुन गेला. पण नंबर 2 च्या पैसे कमावयच्याच मागे लागला, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आणि माजी नेते उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील-पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले उन्मेश पाटील –
यावेळी उन्मेश पाटील म्हणाले की, जिल्ह्याला नंबर 1 वर आणायचं सोडून नंबर 2 चे पैसे कमवायला लागला. हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट मंगू या चंगू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि विकासाला खीळ पोहोचवण्याचं काम केलं. नंबर 2 च्या पैशांची मस्ती यांच्या मस्तकात आहे. सत्तेच्या मस्तीमध्ये कार्यकर्ते यांना नोकर वाटायला लागले आहेत.
आज लक्षात घ्या, मी यांना सांगू इच्छितो की, शाख से तूट जाए वो पत्तीयां नही हैं हम, आंधियो से कह दो तुम अपनी औकात मे रहो. असे म्हणत, हे संकटमोचक नाही तर जिल्ह्यावर संकट आहे. डुप्लीकेट संकटमोचक आहेत, अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता टीका केली.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला नाही. यांची कॅबिनेटमध्ये दाढ उठत नाही. कांद्याच्या संदर्भात चांदवडला गेले. केंद्राकडे जाऊन आपण तोडगा काढू असे म्हणाले. मात्र, गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परवानगी दिली आणि आमच्या कांद्याला परवानगी दिली नाही. केळीला मनरेगा लागू करण्याला यांना वेळ नाही.
मातृशक्ती आणि महिलांच्या नावाने भाजपचे लोक कांगावा करत आहेत. जामनेरचे लोक महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करत आहेत, हे हास्यास्पद आहे. आज या राजकारणाला जिल्हा कंटाळला आहे. यांची निष्ठा तपासा आणि हे निष्ठेच्या गोष्टी करत आहेत. इंग्रज तरी पाठीवर मारायचे. पण हे पोटावर मारत आहेत. यांना आपल्याला हद्दपार करायचं आहे. म्हणून 13 तारखेला मतदान करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.