मुंबई, 24 जानेवारी : देशभरात कडाक्याची थंडी जाणवत असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवसात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता –
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दाट धुक्यामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील अनेक घटकांवर त्यांचा परिणाम झाला आहे. तर बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह काश्मीर खोऱ्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे.
राज्यातील ‘या’ भागात पावसाचा अंदाज –
पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा; म्हणाले, ……महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही!