मुंबई, 8 मार्च : महिलांच्या सन्मानासाठी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्तीच्या सन्मानासाठी वंदे भारत ट्रेनची कमान महिलांच्या हाती सोपविण्यात आली. यामध्ये वंदे भारत ट्रेनच्या प्रवाशांच्या तिकीटापासून ते सुरक्षपर्यंतची संपुर्ण जबाबदारी ही महिलांकडे देण्यात आली.
महिलांच्या हाती वंदे भारत ट्रेनची कमान –
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्यावतीने महिलांच्या हाती सीएसएमटी ते साईनगर शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेनची संपुर्ण कमांड महिलांवर सोपविण्यात आली. दरम्यान, एखाद्या ट्रेनमधील संपूर्ण क्रू मेंबर स्टाफमध्ये महिलांचा समावेश असण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये ट्रेनच्या लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, तिकीट परीक्षक ते केटरिंग स्टाफपर्यंत सर्व महिला आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांकडे सोपविण्यात आलेल्या वंदे भारतच्या ट्रेनचे नेतृत्व आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्याकडे देण्यात आले. यासोबतच सहाय्यक लोको पायलट म्हणून सुनीता कुमारी तर ट्रेन मॅनेजर म्हणून श्वेता घोणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.
सुरेखा यादव कोण आहेत? –
सुरेखा यादव ह्या आशियातील पहिला लोको पायलट आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील सेंट पॉल शाळेत झाले असून त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून भारतीय रेल्वेत त्यांनी नोकरी सुरू केली. 1989 मध्ये सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सन 1996 मध्ये मालगाडी चालक आणि सन 2000 मध्ये मोटरवुमन हा मान त्यांनी मिळवला. सन 2010 मध्ये घाटमार्गावर रेल्वे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठेची असलेली डेक्कनक्वीन एक्स्प्रेसचे त्यांनी यशस्वीपणे सारथ्य केले होते. दरम्यान, सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकोपायलट म्हणून सुरेखा यादव यांची नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा : 2029 पर्यंत आमचं राज्य त्यानंतर राज्यात आणि देशात ‘महिला राज्य’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस