पहाण (पाचोरा), 16 फेब्रुवारी: पाचोरा तालुक्यातील पहाण येथे वीर एकलव्य भगवान जयंती आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजासह संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शंकर आहीरे व मंगेश आबाजी पाटील यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आदिवासी बांधवांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विर एकलव्य भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी विर एकलव्य भगवान यांच्या शौर्य, त्याग, निष्ठा व गुरुभक्तीचे स्मरण करून अभिवादन केले.
यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शनपर भाषणातून वीर एकलव्य भगवान यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान एकोपा, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.






