मुंबई, 20 मार्च : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. यासोबतच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील याप्रकरणावरून आरोप केले जात आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न केला जातोय. कोर्टात आहे कोर्टात बोलू आणि कोर्टात उत्तर देऊ, असे ते म्हणाले आहेत.
दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात याचिका –
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात काल बुधावार 19 मार्च रोजी याचिका दाखल केलीय. याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत मुलीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना धारेवर धरले जात आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद आज उमटले आहेत.
View this post on Instagram
आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी –
दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात केलेल्या याचिकेत सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. यासोबच सीबीआय चौकशीची देखील मागणी करण्यात आल्याने हे प्रकरण राज्यात पुन्हा चर्चेत आहे.
दिशा सालियन प्रकरणाचे विधानसभेत उमटले पडसाद –
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विधानसभेत भाजप आमदार अमित साटम यांनी हे प्रकरण सभागृहात मांडले. दिशाचा मृत्यूपूर्वी पार्टी झाली होती का? विविध मतप्रवाह समोर येत आहेत.. एसआयटी नेमूनही कुठलाही निष्कर्ष समोर आलेला नसून सतिश सालियान यांनी आरोप केलेत की दिशावर सामुहिक बलात्कार करून खून केला गेला. दरम्यान, एसआयटीने काय चौकशी केली हे कधी समोर येणार? असा सवाल सभागृहात साटम यांनी उपस्थित केला. यासोबतच आमदार अर्जून खोतकर, मंत्री नितेश राणे आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील याप्रकरणावर विधानसभेत सवाल उपस्थित केले.
तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणावरून भाजपवर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, दिशा सालीयन प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. कोर्ट यावर योग्य तो निर्णय देईल. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. न्यायालय या याचिकेत काय निर्णय घेतेय. हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.
दिशा सालियन मृत्य प्रकरण –
दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक म्हणून मुंबईत काम करत होती. असे असताना 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून या प्रकरणात खळबळजनक दावे केले जात होते. अशातच आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.