नागपूर, 14 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला मुलीची शपथ घेऊन राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते, असा गौफ्यस्फोट केला. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाची चर्चा करुन गणेशोत्सवानंतर त्यासंदर्भात योग्य तो निर्णय केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
View this post on Instagram
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
एकनाथ खडसेंनी केलेल्या राज्यपाल पदाच्या गौफ्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र, त्यांच्या संदर्भात, आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाची चर्चा करुन गणेशोत्सवानंतर त्यासंदर्भात योग्य तो निर्णय केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
एकनाथ खडसेंनी नेमका काय गौफ्यस्फोट केला होता –
शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, एके दिवशी मला देवेंद्रभाऊंनी बोलवलं. जसा पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, तसा मला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघेच जण होतो. ते म्हणाले, नाथाभाऊ तुम्हाला मी राज्यपाल करणार आहे. मी त्यांना म्हणालो, खरं सांगा. तुम्ही बऱ्याचदा हे करणार, ते करणार, पण ते काही झालं नाही. मला जरा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, नाही. तुम्हाला राज्यपाल करू. आम्ही करतोय. म्हटलं आनंदाची बातमी आहे, पण माझा विश्वास नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हे देवेंद्रजींचे शब्द होते, हे मी जाहीर सांगत असल्याचा मोठा गौफ्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
हेही पाहा : Video : लढाई आमदारकीची : शरद पवार की अजित पवार?, पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची स्फोटक मुलाखत