मोराणे (धुळे), 2 ऑक्टोबर : मतदान करणे हा फक्त आपला हक्क नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे प्रतिपादन मोराणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजाळ यांनी केले. समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात मतदान जाणीव जागृती व ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.
काय आहे संपुर्ण बातमी? –
समता शिक्षण संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम व ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा महाविद्यालयात संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. मतदान अधिकाधिक प्रमाणात व्हावे यासाठी सर्वांनीच महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी हे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडणूक काळात काम करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात मोराणेचे तलाठी व्ही. एच. बेहेरे यांनी ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ज्यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन वर मतदान करण्याचा प्रयत्न केला. ईव्हीएम मशीन आणि इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यशाळेत मोराणे सर्कलचे मंडल अधिकारी सागर नेमाने, महिंदळे तलाठी शिरसाट आप्पा, शिवदास पाटील व इतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच कार्यशाळेस प्रा. डॉ. रघुनाथ महाजन हे उपस्थिती होते. सदरील कार्यशाळेचे सूत्रसंचालन रासेयो सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सुदाम राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. फरीदा खान यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सर्व स्वंयसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराचे आयोजन –
समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व शासकीय रुग्णालय धुळे यांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराच्या प्रसंगी सर्वप्रथम प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राहुल आहेर, सहाय्यक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी रक्तदान केले. यांच्यासह महाविद्यालयातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदान श्रेष्ठदान हे संस्कार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आले. ज्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच गावातील उत्साही नागरिकांनीही या रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
हेही वाचा : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी 2000 रुपये जमा होणार