नांदेड : ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसांचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गांना काय द्यायचंय, अल्पसंख्यांकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते नांदेड येथील कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने आम्हाला पुन्हा निवडून दिल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये प्रति महिना सन्मान निधी दिला जाईल, असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. यानंतर महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय मिळाला. पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले. या सरकारला आता 4 महिने होत आहेत, तरीही महायुती सरकारने 2100 रुपये रक्कम दिलेली नाही. अद्यापही लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत. यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तसेच लाभार्थी लाडक्या बहिणीही आपल्याला 2100 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचे भाष्य केले असून लाडक्या बहिणींना एक सल्लाही दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार –
अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मी नाही म्हटलेले नाही. पण ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसांचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गांना काय द्यायचंय, अल्पसंख्यांकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत. दिलेली योजना मला चालू ठेवायची आहे.
आम्हाला, सरकारला चालू ठेवायची आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतोय की, काही बँकांना आम्ही तयार करत केले आहे, त्यामध्ये जर तुम्हाला पाच-पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, लाडकी बहीण योजनेत ज्या महिला बसतात, त्यांनी एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो, तसं जर 20 महिला आल्या तर 20 गुणिले 50 हजार म्हणजे 10 लाख रुपये होतात. या 10 लाख रुपयांचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकतात. 20 महिलांचे महिन्याचे 15 दुणे तीस हजार येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातून देता येईल. 10 लाखांतून त्या ग्रुपला चांगल्या पद्धतीने एक चांगला व्यवसाय करता येईल, असेही अजित पवार म्हणाले.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी काय सांगितलं?
शिर्डी येथे आज माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सांगितले की, विरोधकांच्या डोळ्यात आधीपासूनच लाडकी बहीण योजना खूप आलेली आहे. 28 जून 2024 रोजी ही योजना जाहीर झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी या योजनेची प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही. लाडक्या बहिणींना दिलेले 1500 रुपयांचे वचन पूर्ण केलेले आहे. 2100 रुपयांचे दिलेल्या वचनापासूनही आम्ही काही फारकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा आनंद असाच चालत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.