चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहे मीनल करनवाल?
मीनल करनवाल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षण कालावधी पुर्ण केला. यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार येथे सेवा बजावली. यानंतर त्या नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, आता आएएस अधिकारी मीनल करनवाल या जळगाव जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) झेडपी सीईओ म्हणून रुजू होणार आहेत.
मीनल करनवाल या मूळच्या उत्तराखंडमधील डेहरादूनच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे सेंट जोसेफ अकदामी डेहराडून याठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज याठिकाणी झाले. यासोबतच त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात शिक्षण घेतले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी दिल्ली येथून बिझनेस एथिक्स अँड कंपनी लॉ या विषयात एलएलएमचे शिक्षण घेतले आहे.

तिसऱ्या प्रयत्नात मिळालं यश –
मीनल करनवाल यांनी आपल्या पदवीच्या शिक्षणानंतर यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र, 2016 आणि 2017 मध्ये त्यांना अपयश आले. पण 2018 मध्ये आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी आणखी कठोर परिश्रम करत यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत आयएएस सेवा मिळवली. 2018 मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 35 मिळवली. प्रचंड मेहनत आणि अभ्यास करत त्यांनी या यशाला गवसणी घातली. आता त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून रुजू होणार आहेत.
12 वर्षांनी महिला मुख्य कार्यकारी अधिकारी –
तर याआधी 16 नोव्हेंबर 2009 ते 05 जून 2012 या काळात आयएएस अधिकारी निरुपमा डांगे या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर निरुपमा डांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर 2012 मध्ये त्यांच्या जागी शितले उगले यांची नियुक्ती करण्यात आली होती. 6 जून 2012 ते 18 सप्टेंबर 2014 पर्यंत त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे शीतल उगले यांच्यानंतर आता 12 वर्षांनी जळगाव जिल्हा परिषदेला आएएस अधिकारी मीनल करनवाल यांच्या रुपाने महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्या आहेत.
हेही वाचा – Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर