चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 9 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवड्याचा काल तिसरा दिवस होता. यामध्ये नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेसंदर्भात बोलताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणी, शेतकरी तसेच व्यापारी बांधव यांच्या संदर्भात सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. मात्र, यासोबतच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील दोन मोठ्या गावांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी केली.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले ? –
यावेळी नगरविकास विभाग भाग क्रमांक 88 पान नंबर 55 च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेसंदर्भात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आज शहराकडे पाहून, इतर जी लहान लहान गावे आहेत, माझ्या मतदारसंघात पिंपळगाव (हरेश्वर) असेल किंवा नगरदेवळा असेल आता या नगर पंचायतीच्या बरोबरचे गावे त्याठिकाणी आहेत. आम्ही ही गावे नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि दुसऱ्या बाजुला ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. तर ग्रामपंचायतीची आचारसंहिता लागण्याआधी नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरेश्वर) नगरपालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करावा, अशी महत्त्वाची मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सरकारकडे केली.
View this post on Instagram
लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक –
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मागील 3 वर्षांपासून खोळंबळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय दिल्यानंतर आता आगामी 2-3 महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची आज 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिली बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यात लवकरच निवडणुकींचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान, आजच्या या बैठकीत निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मतदार संख्या, मतदान केंद्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, आवश्यक मनुष्यबळ, वेळेवर उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
त्यामुळे आता आगामी काळात निवडणुकांच्या आधी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पिंपळगाव (हरेश्वर) आणि नगरदेवळा या दोन गावांना नगरपंचायतीचा दर्जा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






