जळगाव, 5 ऑगस्ट : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेतील रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गातून एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. यानुसार जळगाव जिल्हा परिषदेमार्फत एकूण 626 जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अर्ज प्रक्रिया आज ५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
मंत्री गिरीश महाजनांची माहिती –
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद भरतीबाबत सांगितले की, मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना महामारी व इतर अनेक कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतरच्याय शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे.
खान्देशात किती जागा –
खान्देशातील जळगावसह नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेमार्फत 626 तर नंदुरबार जिल्हापरिषदेमार्फत 475 जागा भरल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे धुळे जिल्हा परिषदेचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून 25 ऑगस्ट 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा प्रक्रिया –
जिल्हा परिषद भरतीसाठी संगणकीकृत परिक्षा होणार आहे. परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार आहे. यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
महत्वाची माहिती –
भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणीकृत यंत्रणेद्वारे तयार केले जाणार आहे. यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परिक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नसल्याचे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ज्यांनी मार्च 2019 मध्ये अर्ज केला होता, त्यांचं काय?
ज्या उमेदवारांनी मार्च,2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरिता अर्ज केला होता व वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना 31 डिसेंबर,2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता पात्र करण्यात आले आहे.
कमाल वयोमर्यादेत शिथिलता –
ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरिता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली असून 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेद सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता पात्र करण्यात आले आहे.