जळगाव, 23 मार्च : जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये काल 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण 11 हजार 81 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 31 कोटी 55 लाख 76 हजार 939 रुपयांची वसुली करण्यात आली.
या लोक अदालतीमध्ये 9 हजार 263 दाखलपूर्व आणि 1 हजार 805 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच 19 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेत आणखी 681 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एस. एन. राजुरकर, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश-1 जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वी झाली. सर्व न्यायाधीश, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांच्या सहकार्याने या उपक्रमाला मोठे यश लाभले.
पाचोऱ्यात सुमारे 4 कोटींची वसुली-
पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा समितीचे प्र.अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. एस बोरा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 166 प्रकरणे निकाली लागली. यामध्ये 2 कोटी 4 लाख 14 हजार 583 रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व 892 प्रकरणांचा निपटारा होवून यात 2 कोटी 14 लाख 26 हजार 892 रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. तसेच एकूण 4 कोटी 18 लाख 41 हजार 475 रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी दहा वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.
हेही वाचा – रावेर तालुक्यातील 750 हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा, महसूल प्रशासनाने राबवली ही महत्त्वाची मोहीम