ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – पाचोरा तालुक्यात एका तरुणाकडे 2 गावठी पिस्टूल तसेच 4 जिवंत काडतूस आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 2 गावठी पिस्टूल तसेच 4 जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी –
पाचोऱ्यातील ए 1 काटा, जारगाव चौफुली परिसरात एका व्यक्तीजवळ गावठी कट्टे असून तो काहीतरी गुन्हेगारी कारवाई करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचुन या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याच्याजवळून 2 गावठी पिस्टल आणि राऊंड जप्त करण्यात आले. अरबाज खान जहूर खान (वय-24) असे आरोपीचे नाव आहे. तो पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील रहिवासी आहे.
गुप्त माहितीचे आधारे पोलिसांनी ए1 काटा, जारगाव चौफुली परिसरात सापळा रचला. यावेळी याठिकाणी एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना तसेच वारंवार कंबरेस हात लावताना आढळला. यानंतर गुप्त माहितीप्रमाणे खात्री होताच पोलिसांनी त्याला जहुर भाई रेडिअर्स, दुकानाजवळ काल साडेचार वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी आरोपी अरबाज खान जहूर खान याच्याजवळ प्रत्येकी 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, आणि 4 जिवंत काडतूस असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अरबाज खान जहूर खानला अटक केली असून याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के हे करत आहेत.
दरम्यान ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांनी केली.