ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरे.(पाचोरा), 16 मे : गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यावर कर्ज झाले असल्याने नातवाने आजीला पैसे मागितले. मात्र, आजीने कर्ज फेडण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने 22 वर्षांच्या नातवाने 80 वर्षांच्या आजीचा खून करत तिचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याची हादरवणारी घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावात घडली. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मंजाबाई बाप दगडू भोई (वय-80 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना काल बुधवारी 15 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावात घडली.
काय आहे संपूर्ण घटना –
काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पिंपळगाव हरेश्वर गावातील मुल्लावाडा येथील मंजाबाई भोई या 80 वर्षांच्या महिलेच्या घरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. तसेच या महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आणि दंडावरील चांदीचे कडे बळजबरीने काढून घेतले. इतकेच नव्हे तर या महिलेचा खून करुन तिला एका बारदान पोत्यात बांधून ठेवले, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर यांनाही बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी मंदाबाई भोई यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर मंजाबाई भोई यांचे नातेवाईक यांना घटनेबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात बोलावले असता त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन सदर घटनेबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात कलम 302,397,452 प्रमाणे आज 16 मे रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजीत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितू पाटील, पोलीस नाईक दिपक अहिरे आणि इतर सहकऱ्यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढली. यामध्ये पोलीस तपासात मृत मंदाबाई भोई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई (वय-22, रा. पिंपळगाव हरे) याने हा खून केल्याचा दाट शक्यता आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली.
त्यावरून विशाल भोई याबाबत माहिती घेतली असता तो मृताचा शवविच्छेनद करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे जाऊन विशाल याला ताब्यात घेतले. तसेच यावेळी त्याची संबंधित घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली.
आरोपीने दिली धक्कादायक कबुली –
आरोपीने पोलिसांना सांगितले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने मी कर्ज फेडण्यासाठी आजी मंजाबाई भोई हिच्याकडे पैसे मागितले होते. मात्र, तिने नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. तसेच तिच्या अंगावरील एक चांदीचे कडे व कानातील सोन्याच्या बाळ्या काढून आजीचे प्रेत पोत्यात बांधून ठेवले होते, अशी कबुली त्याने दिली. आरोपीने जबाब दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याला पाचोरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास,पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करत आहेत. या घटनेने पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद