चाळीसगाव, 23 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकतेच ग्रामंपचायत निवडणुकीचा धुराळा उडाला. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात गावागावामध्ये नवे सरपंच निवडून आले. काही ठिकाणी सूनेनं सासूला हरवलं आहे तर कुठे आईने मुलीला हरवलं. पण यासोबतच जळगाव जिल्ह्यात एक गोष्ट विशेष घडली आणि ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक 22 वर्षांची उच्चशिक्षित तरुणी सरपंचपदी विराजमान झाली आहे. या तरुणीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
शुभांगी रहिले असे या सरपंच झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुभांगी रहिले या तरुणीने चाळीसगाव तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदावर विजय मिळवला. सध्या शुभांगी ही एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. शिक्षण सुरु असतानाच तिने राजकारणात प्रवेश करत सरपंचपदावर विजय मिळवला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात या 22 वर्षांच्या तरुणीने सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर जोरदार चर्चा होत आहे.
विजयानंतर शुभांगी राहिले काय म्हणाली –
आपण उमेदवारी भरू शकतो. पण त्यासाठी निवडून येणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गावकऱ्यांचे सहकार्य खूप महत्त्वाचे असते. मला गावातील युवक, युवती, महिलावर्ग आणि सर्वांनीच सहकार्य केले. त्यामुळे आता यानंतर मीसुद्धा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. शिक्षण, आरोग्य काहीही असो यासंदर्भातील त्यांच्या समस्या सोडवेन. भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी माझ्या गावापर्यंत पोहोचल्या नाही आहेत, त्या योजना गावात पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन, असे नवनिर्वाचित सरपंच शुभांगी रहेली ही तरुणी म्हणाली. गावाचा विकास करण्यासाठी मी राजकारणात आली, असे तिने सांगितलं.
शुभांगी हिचे वडील ग्रामपंचायतीचे सदस्य होते. तसेच तिचे काकाही दुध डेअरीमध्ये होते. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, असे शुभांगी हिने सांगितले. गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असेही ती म्हणाली. दरम्यान, आता एम.एस्सी. चे शिक्षण घेणाऱ्या शुभांगीला गावाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यात ती आता जनतेच्या किती अपेक्षा पूर्ण करते, कसा कारभार करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिच्या या निवडीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.