जळगाव, 10 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात 2019 मध्ये भडगाव, पाचोरा, रावेर, भुसावळ, जळगाव, चोपडा, व यावल या तालुक्यात शेत पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, या शेत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या काल (9 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
वादळी पावसामुळे 11 जून 2019 रोजी भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने 3 कोटी 25 लाख रुपये अनुदान मंजूर करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 3,856 बाधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर –
तसेच जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती देखील मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.