चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
भुसावळ (जळगाव) – महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, यामध्ये कुणाची वर्णी लागणार, खान्देशातून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल नागपुरातील राजभवन येथे पार पडला. यामध्ये खान्देशातून एकूण 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे या चारही जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून 3 तर धुळे जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे.
जळगावातील या तीन जणांना संधी –
जळगाव जिल्ह्यातून महायुती सरकारमध्ये आधीही मंत्रिपदी राहिलेले जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. मात्र, यासोबतच आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ मतदार संघातून सलग चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. आमदारकीचा चौकार मारल्यानंतर संजय सावकारेंना भाजपने कॅबिनेट मंत्रिपदाचे गिफ्ट दिले आहे. काल संजय सावकारे यांनीही महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यानंतर आता संजय सावकारेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
आतापर्यंत असा राहिलाय आमदार संजय सावकारेंचा प्रवास –
आमदार संजय सावकारे यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे झाला. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केला आहे. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा भुसावळ विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि पहिल्याच वेळी त्यांनी विजय मिळवला होता. यानंतर त्यांना आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. तसेच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.
दरम्यान, 2014 मध्ये संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014, 2019 आणि 2024 ची विधानसभेची निवडणूकही जिंकली. अशाप्रकारे 2009 पासून सलग चारवेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी याठिकाणी केला आहे.
आतापर्यंत भूषवलेली पदे :
- राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री – जळगाव
- विधानसभा सदस्य भुसावळ विधान सभा सन 2009 ते 2014, 2014 ते 2019,
- अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार समिती
- सदस्य – लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधानमंडळ मुंबई
- सदस्य, धर्मदाय रुग्णालय तपासणी समिती, महाराष्ट्र विधानमंडळ मुंबई
- सदस्य, – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी भुसावळ
सध्या भूषवित असलेली पदे :
- विधानसभा सदस्य भुसावळ विधानसभा सन 2024
- संचालक – जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक लि. जळगाव
- संचालक जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. जि. जळगाव
- सदस्य – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी भुसावळ
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘या’ 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ