नंदुरबार – गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार अनेकांची मोठी अर्थिक फसवणूक करत आहेत. त्यातच आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सिमकार्ड हॅक करून एका व्यक्तीची तब्बल 50 हजारात फसवणूक करण्यात आली आहे. नवापूर येथे ही धक्कादायक घटना घडली. सुनील छोटू पवार असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवापूर येथील पोलिसात फसवणुकीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
सुनील छोटू पवार हे नवापूरच्या महादेव गल्ली भागातील रहिवासी आहेत. 27 नोव्हेंबर रोजी सुनील छोटू पवार यांचा मोबाइल नंबर एका अज्ञात व्यक्तीने हॅक केला. त्या नंबरला जोडलेल्या बँक खात्यातून समोरच्या व्यक्तीने परस्पर 50 हजार रुपये काढून घेतले. यामध्ये स्टेट बँक खात्यातून 27 हजार रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून 23 हजार, असे एकूण 50 हजार रुपये सायबर गुन्हेगाराने काढून घेतले.
दरम्यान, आपल्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली गेल्याचे मेसेज आल्यावर सुनील पवार यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच बँकेत आणि इतर ठिकाणी तपास केला असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तत्काळ नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार दादाभाऊ वाघ करीत आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का?, एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स, काय म्हणाले?