जळगाव – गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. तसेच यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली. जळगावात वाळूच्या डंपरने 13 वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले. या घटनेनंतर जळगावात नागरिकांनी डंपरच पेटवला. तसेच तब्बल 4 तास वाहतूक ठप्प होती.
काय आहे संपूर्ण घटना –
जळगाव शहरातील कालिका माता चौफुलीजवळ हा अपघात घडला. भुसावळकडून जळगावकडे भरधाव येणाऱ्या एका वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात एका 13 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील चिमुरड्याचा मामा आणि बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तो अयोध्या नगरमधील रहिवासी होता. काल बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
योजस हा आपल्या मामासोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून निघाला होता. यावेळी त्याचे मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बऱ्हाटेही सोबत होते. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जमावाने डंपर पेटवले –
दरम्यान, या भीषण अपघातात चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने डंपर पेटवले आणि महामार्गावर आंदोलन करत वाहतूक पूर्णपणे बंद केली. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त नागरिकांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तब्बल तासभर नागरिकांना पोलिसांना घटनास्थळावरून हटवता आले नाही.
आठवडाभरात सहावा मृत्यू –
अपघातानंतर डंपरचालक घटना घटनास्थळावरुन फरार झाला. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव शहरात आठवडाभरात 6 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.