चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 13 मे : राज्यात एककीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना मुंबईतील घाटकोपरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तर या घटनेत 66 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता –
प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलत घटनास्थळी अद्याप मदतकार्य सुरू केले आहे. यासाठी एनडीआरएफची देखील टीम दाखल झालेली आहे. दरम्यान, या घटनेच्या ठिकाणी अजून 25 ते 30 जण अडकल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळं मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील जोरदार वाऱ्यामुळे, घाटकोपर मधील छेडानगर परिसरात आज सायंकाळी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली.
घटनास्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, एन विभाग, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, मुंबई महानगर प्रदेश विकास…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 13, 2024
घाटकोपरमध्ये नेमके काय घडले? –
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून अवकाळी पाऊस बरसतोय. दरम्यान, मुंबईत आज अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस पडला. दरम्यान, घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहने अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.
घाटकोपरमधील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 66 जण जखमी झाल्याचे समजते. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. तसेत मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.