अमरावती, 17 जानेवारी : “गझल आंतरमनाची कळ आणि बाह्य संघर्षाची झळ असते. ती काळजात साखर पेरते. साहित्य माणसे जोडण्याचे कार्य करते तर गझल व्यक्तीसापेक्षता मानते. ती एक वेगळी विधा असून तिची तंत्रशुद्धता हेच तिचे बलस्थान असते. वाह पासून आह असा गझलेचा प्रवास असतो. आणि ही अनुभूती प्रखर सामाजिक जाणिवा संप्रेषित करणाऱ्या चंद्रशेखर भुयार यांच्या “समाधी” या गझल संग्रहातुन वाचकास येते,” असे मत मराठी, हिंदी, उर्दूचे ख्यातनाम गझलकार अनंत नांदूरकर “खलिश” यांनी व्यक्त केले.
अमरावती शहरातील अभियंता भवन येथे रविवारी संपन्न झालेल्या “समाधी” या गोटीबंद गझल संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मनपाचे माजी नगरसेवक तुषार भारतीय होते. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते गीतकार प्रा. डॉ. गोविंद गायकी, मसासंम सदस्य पुष्पराज गावंडे, नाना लोडम, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिंमत ढाले, ललित कदम व गझलकार चंद्रशेखर भुयार मंचावर उपस्थीत होते.
“समाधी” हे शीर्षक योग्य –
“भुयार यांची गझल वाचकाशी थेट संवाद साधणारी असून गझलकाराच्या प्रखर सामाजिक जाणिवा व त्यांचा अध्यात्मिक पिंड अधोरेखीत करते. रुपकं, प्रतिमा, प्रतीकांचा सुयोग्य वापराने भुयारांची गझल सामन्यतेतही आपले वेगळेपण जोपासते व त्यामुळेच त्यांचे शेर आल्हाददायक व थेट वाटतात. चिंतनशिलतेच्या गर्तेत हरवून त्रयस्थपणे लिखाण केल्याने संग्रहाचे “समाधी” हे शीर्षक योग्य आहे,” असे नांदूरकर पुढे म्हणाले.
तसेच आपल्या भाषणात ढाले यांनी भुयार यांचे लिखाण गझलेला खऱ्या अर्थाने उभारी देणारे असल्याचे मत व्यक्त केले. तर आपल्या मनोगतात भुयार यांनी ‘समाधी’ हे गझल क्षेत्रातील आपल्या तपपूर्तीचे सार्थक असून यातील प्रत्येक शेर हेच आपले मनोगत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – “ज्या ताटात खाल्लं त्या ताटात…”, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? VIDEO
ललित कदम यांनी भुयारांच्या गझलेत राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बाबींचा योग्य समन्वय असल्याचे सांगून जीवनदृष्टी फकिरीची झाली तरच माणूस गझलेत “बादशहा” होतो, असे विचार मांडले. प्रा. गायकी यांनी भुयारांची गझल वेगळी असल्याने गझल प्रांतात ती टिकेल व त्यांचा संग्रह मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रसंगी पुष्पराज गावंडे व नाना लोडम यांचीही समयोचित भाषणे झाली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात तुषार भारतीय यांनी व्यवस्था बदलण्याच उत्तम शस्त्र गझल असल्याचे सांगून भुयारांचा गझल संग्रह परिपूर्ण असल्याचे मत मांडले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रा. रवी चापके यांनी सूत्रसंचालन केले तर महेन महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती –
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, विकास अधिकारी राम घनमने, वित्त व लेखा अधिकारी दत्ता फिस्के, खंडारे, सचिन पवार, गजानन काळे, प्रविण वंचरे, संतोष शिंगणे, संजय कावरे, महेश हंबर्डे, भगवान राईतकर, मनोज लोणारकर, नितीन देशमुख, मसूद पटेल, अनिल जाधव, प्रिती वाडीभस्मे, गोपाल मापारी, सुनिल ठाकुर, धनंजय तांदळे, निर्मला सोनी, चंद्रशेखर तारे, रविंद्र ठाकुर, ओमप्रकाश ढोरे, विनोद बुरबुरे, विद्यानंद हाडके, माधव सावंत, सुदाम सोनुले, संजय गावंडे, प्रा. अजय खडसे, अमोल शेळके, मनोज गुडधे, आबासाहेब कडू, नंदकिशोर दामोधरे, रौराळे, आकाश भुयार, कु. वेदांती भुयार, सौ. जयश्री चं. भुयार, भारतीय जन संचार संस्थेचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments 1