पुणे : पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने दिल्ली येथे आयोजित केल्या जाणाऱ्या 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडीअम, दिल्ली येथे होणार आहे.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज रविवारी संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली. या बैठकीला अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन, नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर यावेळी उपस्थित होते.
डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांच्यात शेवटपर्यंत लढत –
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत डॉ. तारा भवाळकर –
प्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा गव्हाणकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म 1 एप्रिल 1939 या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. ताराताई भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे आणि लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे. जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत