पाचोरा, 24 जानेवारी : आज सर्वत्र राष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याच राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील जामनेर रोड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने या खाऊचे वाटप करण्यात आले.
मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी आणि शिक्षणाचा हक्क मिळावा, तसेच याबाबतची जनजागृती व्हावी, या उद्देशाने आज येथे मुलींना खाऊचे वाटप केले, असे यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी यावेळी सांगितले.
तसेच हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण याच हेतूने आम्ही काम करत आहोत. यापुढे देखील याच हेतूने काम करत राहणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पाचोऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
दरम्यान, यावेळी युवासेना तालुका प्रमुख भूपेश सोमवंशी, शहर प्रमुख हरीश देवरे, शहर संघटक प्रशांत सोनार, गणेश बडगुजर, अॅडव्होकेट गौरव पाटील यांच्यासह मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, शिक्षक डॉ. वाल्मीक अहिरे, आर. डी. पाटील, शिक्षिका सौ. आशा जाधव, सौ. मीना हिवरे, तसेच युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा करतात ?
24 जानेवारी 1966 या दिवशीच इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. यानंतर 2009 सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त आणि सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.