ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 ऑक्टोबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आल्यानंतर भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, ते उद्या 27 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतची माहिती पाचोऱ्यात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अमोल शिंदे यांनी दिली.
अमोल शिंदे उद्या उमदेवारी अर्ज दाखल करणार –
मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने अमोल शिंदे पराभूत झाले होते. दरम्यान, त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याचे ठरविले असून पुन्हा एकदा ते अपक्ष उमेदवार म्हणून उद्या 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी 10:00 वाजता भारत डेअरी चौफुली येथून अमोल शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित केलेल्या रॅलीला सुरुवात होऊन मारुती मंदिर व सप्तशृंगी माता मंदिर कृष्णापुरी – आठवडे बाजारात (परिवर्तन सभा)- गांधी चौक – जामनेर रोड मार्गे – छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होणार आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबतच ठाकरे गटाकडून वैशाली सुर्यवंशी यांनी तर अपक्ष म्हणून माजी आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आता अमोल शिंदे हे देखील निवडणुकीच्या मैदानात असल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार होणार आहे.
हेही वाचा : पाचोरा शहरातून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारास आजपासून झाली सुरूवात