धरणगाव, 3 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा मानला जाणारा जळगाव ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्यातील लढत रंगतदार होत असताना धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावाने सुमारे 50 हजार रूपये लोकवर्गणी जमा करून त्याची सुरूवातही केली आहे. दरम्यान, याची सगळीकडे चर्चा देखील होत आहे.
बिलखेडा ग्रामस्थांनी जमविले 50 हजार –
धरणगाव तालुक्यातील बिलखेडा सारख्या छोट्याशा खेड्याने तर मनाचा मोठेपणा दाखवून गुलाबराव देवकरांना आर्थिक मदत म्हणून सुमारे 50 हजार रूपये लोकवर्गणी जमा करून दिली आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जमा केलेली मदत स्विकारताना स्वतः गुलाबराव देवकर आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढाईत बिलखेडा ग्रामस्थांकडून मिळालेल्या ‘फुल ना फुलाची पाकळी’ आर्थिक मदतीने माझा विजयाचा आत्मविश्वास आणखी वृद्धींगत झाला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री देवकर यांनी दिली. दरम्यान, याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुलाबराव देवकर विरुद्ध गुलाबराव पाटील –
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारमधील मंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर अशी लढत रंगत आहे. एकीकडे गुलाबराव पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर दुसरीकडे गुलाबराव देवकर यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने गुलाबराव देवकर विरुद्ध गुलाबराव पाटील अशी जोरदार लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : जळगाव ग्रामीण : म्हसावदच्या तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश