पाचोरा, 26 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील वाडी येथील आरोपी राजू पाटील याने मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून कापून घेऊन पैसे न देता आरोपी राजू याने शेतकऱ्यांची फसवणूक केली. तसेच यानंतर तो फरार झाला होता. वर्षभरापासून त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, आरोपी राजू पाटील हा गुजरात राज्यातील नवसारी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, मुकेश लोकरे यांनी थेट गुजरात गाठले. यानंतर अतिशय गोपनीय आणि सतर्कतेने सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी अटक केल्यानतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – पाचोरा तालुक्यात 7 क्विंटल कापसाची चोरी, पोलिसांची धडक कारवाई, आरोपीला अटक
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे, पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस नाईक अरुण पाटील, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख यांनी केली आहे.