ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरे.(पाचोरा), 5 नोव्हेंबर : आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या राजकारणातील तिसऱ्या टर्मला आजपासून सुरूवात करतोय. या मतदारसंघात आजपर्यंत हा इतिहास कुणीही घडवलेला नाही. तो इतिहास घडविण्याचे साक्षीदार आपल्याला व्हायचंय. आणि आपण सर्व साक्षीदार होऊन सर्व माझ्या पाठीशी खंबीर साथ द्याल, अशी अपेक्षा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केली. ते पिंपळगाव हरेश्वरमध्ये प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ –
पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. गोविंद महाराजांच्या दर्शनाने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराची आजपासून सुरूवात झाली. यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आजपासून माझ्या प्रचाराला सुरूवात झालेली आहे. असे असताना प्रचारासाठी 13 दिवस शिल्लक असून मतदारसंघात एकूण या 141 गावे आणि 2 शहरात प्रचारासाठी पोहचणे अशक्य असतानाही माझा त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न असेल.
मुलगा (सुमित) आणि मुलगी (प्रियंका) हे मतदारसंघात प्रचारासाठी जाताएत. मी प्रत्येक गावात तसेच प्रत्येकापर्यंत पोहचणे कठीण आहे. म्हणून मी जरी नसलो तरी महायुतीतील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) तसेच आरपीआय पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची जबाबदारी स्विकारावी कुठेही प्रचाराचा खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
‘महायुती अभेद्ध असल्याचा स्मिताताईंनी दिला संदेश’ –
मी ज्यावेळी येथे जाहीर सभेसाठी येईल तेव्हा गावासह तालुक्यासाठी जे काही केले आहे ते तुमच्यासमोर मांडेल, असेही आमदार पाटील म्हणाले. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या. यावर बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, माझ्या प्रचाराच्या शुभारंभाला खासदार स्मिताताई ह्या जळगावाहून थेट येथे आल्या आणि महायुती अभेद्ध असल्याचा त्यांनी संदेश दिला आहे.
खासदार स्मिता वाघ काय म्हणाल्या? –
प्रत्येक गावात 1 कोटींच्या वरील कामे दिली गेलीत आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून झाला आहे. विकासाचे ध्येय समोर ठेऊन जी लोकं कामं करतात आपण त्यांच्या पाठीमागे राहिले पाहिजे. आणि विकास हा दृष्टीकोन समोर ठेऊन आमदार किशोर आप्पा पाटील काम करत असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
दरम्यान, किशोर आप्पा हे महायुतीचे उमेदवार असून महायुती अभेद्ध आहे. आणि आम्ही सर्वजण आणि जनता आपल्या पाठीशी उभे असल्याने मोठ्या मताधिक्याने तुम्हाला निवडून आणू, असा निर्धार खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला. तसेच लाडक्या बहिणींचे आशीर्वाद महायुती सरकारला लाभतील, असेही स्मिता वाघ म्हणाल्या. महायुती सरकारने महामंडळ स्थापन करुन छोट्या-छोट्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही स्मिता वाघ म्हणाल्या.
यांची होती उपस्थिती –
यावेळी श्री. गोविंद महाराज मंदिराचे मठाधिपती शिवानंद महाराज तसेच संस्थानचे अध्यक्ष शामराव कृष्ण महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, डॉ. शांतीलाल तेली, तालुका प्रमुख सुनील पाटील, वसंत भाऊ गीते यांच्यासह महायुतीतील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) तसेच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : Special Report : पाचोऱ्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष, जळगाव जिल्ह्यात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार काट्याची टक्कर