ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून प्रचारादरम्यान नरेटिव्ह सेट करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांच्या या खोटा प्रचाराचा महायुतीतील कार्यकर्त्यांसह मतदारांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केली. आज सायंकाळी शिवालय या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपने बंडखोरांवर केलेल्या कारवाईवर किशोर आप्पा पाटील यांची प्रतिक्रिया –
भाजपमधील इच्छुकांनी बंडखोरी महायुतीतील उमेदवारांविरोधात आव्हान उभे केले आहे. दरम्यान, भाजपने या बंडखोरांविरोधात कारवाई करत आतापर्यंत 40 जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, या यादीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यावर कारवाई झाली नसल्याची चर्चा सुरू असतानाच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावर पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
भाजपने बंडखोरांवर केलेल्या कारवाईवर किशोर आप्पा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत ज्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केलीय त्यांचावर भाजपने कारवाई केली असून यामध्ये 40 लोकांचा समावेश आहे. तसेच त्यांना भाजपने 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या यादीत जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यातील भाजपचे बंडखोर उमेदवार ए टी नाना पाटील तसेच पाचोऱ्याचे बंडखोर उमेदवार अमोल भाऊ शिंदे या दोघांचे नाव नसल्याने जिल्ह्याभरात यांची चर्चा आहे. आणि या चर्चेमुळे आमचे विरोधक मित्र-बंडखोर उमेदवाराकडून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केली. आणि मला माहित झाले की, ज्या-ज्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांविरोधात भाजपमधीलच इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली, अशा 40 जणांवर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली आहे. आता ज्या मित्रपक्षांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर उमेदवार आहेत, अशा लोकांचे तत्काळ पक्षाने राजीनामे मागविलेले होते आणि ते स्विकारले असून मंजूर करण्यात आले आहेत. आणि त्यांचे राजीनामा मंजूर झाल्यामुळे त्या बंडखोर उमेवारांना निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, पाचोऱ्यात अमोल शिंदे यांच्याकडून गैरसमज पसरविला जात असल्याचा आरोप किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत जो काही संभ्रम निर्माण केला गेला तो संभ्रम आता कुठेही नाही. कारण राज्यातील महायुती अभेद्द आहे आणि ही युती अभेद्य असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई पक्षाचे सर्व नेते या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. यामुळे कोणीही कुठलाही नरेटिव्ह सेट केला तर कुठल्याही कार्यकर्त्यावर तसेच मतदारांवर याचा परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचे गुजरातमधील उपमहापौर यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघात निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते स्वतः या मतदार संघावर निगारणी ठेऊन आहेत. जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघाची जबाबदारी ज्या भाजप खासदारांवर दिली आहे. ते देखील उद्या येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दोघांनी यामध्ये लक्ष घातले असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
भाजपचे काही कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करत असल्याचे मुद्यावर बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा विचाराने तसेच आदेशाने चालणारा पक्ष आहे. त्यांना वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर तर त्या आदेशाचे पालन केले जाते. तसेच लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी भाजपच्या आदेशाचे पालन करत त्या माझ्या प्रचाराच्या नारळ फोडण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी पिंपळगाव हरेश्वरमधील प्रत्येक भागात माझ्यासह स्मिताताई प्रचारासाठी गेल्या. दरम्यान, निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. तर ज्यांच्या घोंगड्या गुंतल्या आहेत..ते बंडखोरांसोबत आहेत, असा खोचक टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. दरम्यान, या पत्रकार परिषदेत शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : भाजपची बंडखोरांवर कारवाई; पहिल्या यादीत 40 जणांची पक्षाकडून हकालपट्टी, कोणा-कोणाचा आहे समावेश?