पाचोरा, 27 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर कुठे पुरुष तर कुठे महिलांची सरपंचपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर आता पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता प्रदीप महाजन या विजयी झाल्या आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीची सदस्य संख्या एकूण 13 आहे. याआधीच्या सरपंच संगीता भगत यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत सभागृहात सरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये कविता प्रदीप महाजन यांनी बाजी मारली.
अत्यंत चुरशीची लढत –
कविता महाजन यांनी अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवार सोनाली जगदीश तेली यांचा एका मताने पराभव करीत विजय संपादन केला. सरपंच पदाची निवडणूक कुऱ्हाड खुर्दच्या इतिहासात प्रथमच चुरशीची ठरली. सरपंच निवडणुकीस ग्रामपंचायत सदस्या संगीता भगत, जकिर बी काहकर, सुशीला पाटील, प्रतिभा मुके, कमल बोरसे, सदस्य अशोक देशमुख , उपसरपंच कौतिक पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शंकर बोरसे आणि कैलास भगत उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रकाश डहाके, तलाठी प्रवीण पवार आणि ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन यांनी काम पाहिले.
हेही वाचा – पाचोरा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक, आरोपीला गुजरातमधून अटक
पतीने उचलून साजरा केला आनंद –
या निवडणुकीत कविता महाजन या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. त्यांच्या विजयाची निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर कविता महाजन यांचे पती प्रदीप महाजन यांनी मतमोजणीच्या ठिकाणीच पत्नीला उचलून घेऊन आपला आनंद व्यक्त केला.