पाचोरा, 31 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत लोहारा पोलीस दूरक्षेत्र कार्यालय येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात यावा, अशी मागणी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता शांताराम दगडू बेलदार यांनी केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लिहिले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत लोहारा येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यालय आहे. या कार्यालयाला जवळपास 18 ते 20 खेडे लागून आहेत. तसेच या दूरक्षेत्र कार्यालयाला एकूण 4 पोलीस कर्मचारी नेमणूकीस आहेत. मात्र, त्यातील एकही कर्मचारी लोहारा येथील मुख्यालयी वास्तव्य करुन राहत नाही. लोहारा येथे या पोलीस कर्मचाऱ्यांना निवासासाठी पक्क्या स्वरुपाची घरे उपलब्धे आहेत. तसेच ही निवासस्थाने सुस्थितीत आहे. तरीदेखील तेथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी राहत नाही. अनेकदा या दूरक्षेत्र कार्यालयाला कुलूप असते, असे तक्रारीत म्हटले आहे.
या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनात 9 टक्के दराने घरभाडे भत्ता देण्यात येतो. तर मग लोहारा येथे या पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने असताना घरभाडे देण्याचे कारण काय? हा शासकीय निधीचा गैरवापर नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांचा दरमहा घरभाडे भत्ता बंद करण्यात यावा आणि त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता शांताराम दगडू बेलदार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अर्ज लिहिला आहे.
हेही वाचा – कुऱ्हाड खुर्द सरपंच पदाची निवडणूक, अत्यंत चुरशीच्या लढतीत कविता महाजन यांची बाजी
पिंपळगावचे एपीआय काय म्हणतात?
लोहारा दूरक्षेत्र येथे 4 पोलीस कर्मचारी नियुक्तीला आहेत. तेथे सुसज्ज पोलीस निवासस्थाने बांधेलेली आहेत. मात्र, याठिकाणी हे पोलीस कर्मचारी राहत नाहीत. ते बाहेरगावाहून अपडाऊन करतात. पोलीस कर्मचाऱ्यांना 9 टक्के घरभाडे भत्ता मंजूर केला जातो. त्यांनी तेथे राहणे गरजेचे आहे. मात्र, आम्ही त्यांना सक्ती करू शकत नाही, असे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे म्हणाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.