मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या सरकारचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं काम केलं.
मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी पहिलं काम काय केलं?
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांसाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. pic.twitter.com/t8Z8GPm51B
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 5, 2024