सांगली : गेल्या काही दिवसात राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात माजी उपसंरपंचावर चाकूने वार केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यात माजी उपसरंपचाची रस्त्यात गळा चिरुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
बापूराव देवाप्पा चव्हाण असे मृत माजी उपसरपंचाचे नाव आहे. ते सराफ व्यावसायिकही होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्यावर घटनास्थळावरुन पळ काढला. काल गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गार्डी इथल्या नेवरी रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
विट्यात बापूराव चव्हाण यांचे सराफ दुकान आहे. तसेच गार्डी ते नेवरी रस्त्यावर त्यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय सुद्धा आहे. 2018 ते 2023 या काळात ते घानवड गावचे उपसरपंच होते. दरम्यान, काल गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते गार्डी ते नेवरी रस्त्याने दुचाकीवरून निघाले होते. या दरम्यान, गावाबाहेरच बाहेरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करत त्यांची हत्या केली. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
पुणे जिल्ह्यातही घडली होती अशी घटना –
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले हे रविवारी दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दत्ता गिलबिले यांना मृत घोषित केले.
pune crime news : सपासप वार करून माजी उपसरपंचाचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना