अमळनेर (जळगाव) – गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटनांमध्ये वाढ होत आहेत. तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीला त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवले. याप्रकरणी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं –
अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. संशयित पत्नीने आपल्या लग्नाआधीच्या प्रेमसंबंधांमुळे प्रियकराची मदत घेत प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीलाच संपवले. पोलीस तपासात ही माहिती समोर आली. तुषार चिंधू चौधरी (वय-37, रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर पूजा चौधरी (वय-30) आणि सागर बापू चौधरी (वय-30, रा. मालपूर, दोंडाईचा) असे आरोपी पत्नी आणि प्रियकराचे नाव आहे.
तुषार चिंधू चौधरी हा गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी आली नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
पत्नीचे लग्नाआधीपासून होते प्रेमसंबंध –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चौधरी ही विवाहित होती. तसेच तिच्या लग्नाच्या आधीपासून सागर बापू चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सागर अनेकदा अमळनेर येथे यायचा आणि पूजा हिला घेऊन बाहेर जात होता. सागर याला एक मुलगी असून त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे. त्यामुळे त्याने पूजासोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली आणि पूजानेसुद्धा त्याच्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली होती.
पत्नीने प्रियकराच्या मदतीने असा रचला कट
गुरुवारी पूजा हिने तिचा प्रियकर सागरला अमळनेर बोलावून घेतले आणि तुषार याला माझा नातेवाईक लग्नपत्रिका वाटायला अमळनेरात आला आहे. त्याच्यासोबत पत्रिका वाटायला जा, असे सांगितले. यानंतर सागर आणि तुषार यांची भेट झाली. सागरने तुषारला दारू पाजली आणि मंगरूळ येथे नेत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
दरम्यान, तुषार याच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर पूजाला पोलिसांनी अटक केली. तसेच मालपूर येथून तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली. यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! अमळनेर तालुक्यात ओमनी कार-दुचाकीचा अपघात; 3 जण जागीच ठार