मुंबई – राज्यात महायुतीच्या सरकारचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर काल पासून विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन चालेल.
यामध्ये कालपासून आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडतोय. राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. यामध्ये आज राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरतील, अशी माहिती मिळाली आहे.
मागील अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये राहुल नार्वेकर यांनी मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळेच राहुल नार्वेकर यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विधानसभेत काल शपथविधीच्या पहिल्याची दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत सभात्याग गेला. त्यामुळे काल फक्त सत्ताधारी आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये आतापर्यंत जवळपास 155हून अधिक आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यानंतर आज दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीचे आमदारही शपथ घेणार आहेत. मविआच्या आमदारांचा शपथविधी आज रविवारी पार पडणार आहे.