मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वर्षांच्या महिलांना 1500 रुपये प्रति महिना या योजनेच्या माध्यमातून मिळाला. यानंतर महायुतीला सरकारला ऐतिहासिक असे यश या निवडणुकीत मिळाले. त्यामुळे या योजनेचा निवडणुकीत मोठा प्रभाव राहिला असे बोलले जात आहे. मात्र, यानंतर या योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, अशी चर्चा होत असताना यावर आता राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आणि अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही महिलांना यातून वगळण्यात येणार आहे, अशी चर्चा होत असताना आदिती तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशी चर्चा कुठेही नाही. दुसरी गोष्ट असा कुठेही शासन निर्णय, सर्क्युलर किंवा कुठेही निकषात बदल वगैरे, असा कुठलाही लेखी आदेश शासनाकडून आलेले नाहीत. त्यामुळे ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे.
महिलांमध्ये आनंद आहे. त्या आनंदावर विरजण घालण्याचे काम हे कुठे ना कुठे तरी करण्यात येत आहे. त्यामुळे अजिबातही कुठल्याही माता भगिनींनी अशाप्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. आम्ही ज्यावेळी अर्ज घेतले. त्यामुळे ते ऑफलाईन अर्जही ऑनलाईन भरुन घेतले आहेत. त्यांची पडताळणी झाली आहे. त्यांची छाननी झाली आहे. जर पुढे मागे काही तक्रार आली त्या तक्रारीचे निरसन आणि त्या पद्धतीचे पडताळणी कशी करायची, हे त्या वेळेला शासन किंवा जो विभाग आहे तो ठरवेल. ही योजना सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
तसेच सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची कोणत्याही प्रकारे पडताळणी केली जात नसून ती पडताळणी करण्याचे कोणतेही आदेश दिले गेले नाहीत. ही योजना सुरुळीत सुरू राहणार, असे त्यांनी सांगितले. तसेच 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी देणार याबाबत त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला जाईल, त्यावेळी याबाबत निश्चित विचार करण्यात येईल, असे सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.