मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा (एस. एम. कृष्णा) यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने आपल्या राजकारणातून समाजहित जपणारा आणि देशाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री. एस. एम. कृष्णा यांनी लोकहिताच्या कामासाठी पदे असतात हे ओळखून त्यांनी लोकांचे जीवन उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली.
विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. विशेषतः बंगळुरूचे माहिती आणि तंत्रज्ञान शहरात रूपांतर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
राजकारणातील सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
एस. एम. कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस. एम. कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.
साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दरम्यान, उद्या 11 डिसेंबर रोजी एस. एम. कृष्णा यांच्यावर मंड्या जिल्ह्यातील त्यांच्या गावी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एस.एम. कृष्णा यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
सर्वांवर प्रेम करणारे ते एक दुर्मिळ राजकारणी होते. तसेच ते सभ्यता आणि कार्यक्षम प्रशासकीय कौशल्यांसाठी ओळखले जातील, या शब्दात कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील अनेक राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांनी कृष्णाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.






