जळगाव, 12 ऑक्टोबर: यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी नदीद्वारे पाणी सोडण्यासोबतच सिंचनासाठी कॅनलद्वारे तीन आवर्तने देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे निवदेन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, गिरणा धरणात सध्या १०० टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचे नियोजन करून कॅनलद्वारे तीन आवर्तने दिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासोबतच शेतीच्या सिंचनासाठीही मदत होऊ शकते. कमी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेणे शक्य होईल.
चारा आणि रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत –
सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतीची कामे सुरू झाल्याने शेतमजुरांनाही रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा मिळू शकतो. गिरणा कॅनलवर अवलंबून असलेल्या सुमारे १५० गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन आवर्तनांचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अॅड. विश्वासराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख स्वप्निल पाटील, कजगावचे सरपंच अनिल महाजन, युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश सूर्यवंशी, निंभोरा येथील विश्वास पाटील, कोळगावचे भाऊसाहेब केदार, गोंडगावचे दीपक पाटील आणि पिचर्डे येथील परशुराम सपके यांच्यासह भडगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.






