जळगाव – राज्यात गृहमंत्री कोण आहे, आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईनासे झालेले आहे, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर सावध प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले.
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे काय म्हणाले –
जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा करत याठिकाणी आमदाराच्या मामाला पळवले जाते. त्याचा खून केला जातो. याठिकाणी कालची पुण्यातली घटना पाहिली तरी, जबरदस्तीने पळवून खून केला जातो. राज्यात अलीकडे दररोज दिवसाढवळ्या खून, चोरी, दरोडे, व्हायला लागले आहेत. राज्यात गृहमंत्री कोण आहे, आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईनासे झालेले आहे. त्यामुळे तातडीने कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचे असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि कायदा व सुव्यवस्थेची वाया गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणा, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.
गुलाबराव देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर सावध प्रतिक्रिया –
गुलाबराव देवकर हे शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती स्वत: गुलाबराव देवकर यांनीच दिली आहे. गुलाबराव देवकर यांच्या या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचबाबत एकनाथ खडसेंना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘देवकरांनी परवाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे देवकरांना काय करायचे आहे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या निर्णयाबाबत अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकतात’.
eknath khadse on gulabrao deokar VIDEO – गुलाबराव देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर एकनाथ खडसे
अजित पवार-शरद पवार भेटीवर एकनाथ खडसे काय म्हणाले?
राजकारणात एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलो आहेत. त्यामुळे वाढदिवस असेल, लग्नाचा, मरणाचा प्रसंग असेल याठिकाणी सर्व राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे. त्या प्रथेनुसार अजित पवार, सुनेत्राताई, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सर्वांनी आज शरद पवारांचे आशिर्वाद घेतले आहेत, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारा उशीर का –
राज्यभरात महायुतीला बहुमत येऊन आता 12 दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायलाही वेळ लागला. आतल्या आत त्यांचे मतभेद असावेत. एकमेकांविषयी विश्वासाची भावना नसावी. कुणाला किती मिळालं पाहिजे, अधिक मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असावा. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल, असे एकनाथ खडसे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?