चंद्रकांत दुसाने/मिलिंद वाणी,
नागपूर – नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचा विषय मांडत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीजबिल माफी देण्यात यावी. तसेच जे परंपरागत कृषीपंपांना आपण वीज कनेक्शन देत होतो, तेही सोलरपंपामुळे बंद करण्यात आले. ते वीज कनेक्शनही देण्यात यावे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी यावेळी केली.
विधानसभेत काय म्हणाले आमदार अमोल जावळे –
विधानसभेत बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, रावेर विधानसभा क्षेत्रात मागच्या आपल्या युती सरकारने अत्यंत महत्त्वाची अशी वीजबिल माफी दिली आहे. साधारणत: साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना वीजबील माफी दिली आहे. माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रात अंदाजे 29 हजार वीज कृषीपंप आहेत. त्यापैकी साधारणत: 22 हजार कृषी पंप हे साडेसात एचपीच्या वर आहेत. कारण अंडरग्राऊंड वॉटर टेबल भूजल पातळी असल्यावर खालावलेली आहे. त्यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना हा वीजबील माफीचा लाभ मिळाला आहे.
तसेच दुसरी अडचण अशी आहे की, सोलर पंप देत असल्याने ते सोलर पंप साडेसात एचपीपर्यंतच दिले जातात. परंतु भूजल पातळी 200 फुटापेक्षा खाली गेल्याने त्याचा फायदाही रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीजबिल माफी देण्यात यावी. तसेच जे परंपरागत कृषीपंपांना आपण वीज कनेक्शन देत होतो, तेही सोलरपंपामुळे बंद करण्यात आले. ते वीज कनेक्शनही देण्यात यावे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी यावेळी विधानसभेत केली.
अमोल जावळे हे रावेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपने त्यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची मागणी केली.